बदलापूर: लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना तसेच निवडणुकीला काही दिवस राहिले असताना बदलापूरमध्ये पक्षांतर्गत कुरबुरीना कंटाळून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला हादरा बसला आहे.
पक्षातील गटबाजीला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे वडनेरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून शहराध्यक्ष पदावर आल्यापासून शहरात पक्ष बळकट करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे श्री. वडनेरे म्हणाले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा प्रभारी सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचे रॅली, मेळावे आयोजित करणे तसेच शहराच्या भागाभागात प्रचार करणे यात सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन चांगले वातावरण निर्माण करण्याचे काम केले. मात्र त्यानंतरही बदलापुरात राहणारे पक्षाचे दोन प्रदेश पदाधिकारी कुरघोडीचे राजकारण करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असल्याचा आरोप श्री. वडनेरे यांनी केला. प्रदेश पदाधिकारी यांचा नामोल्लेख मात्र वडनेरे यांनी टाळला.
दोघांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे वडनेरे यांनी सांगितले. पक्षाचे वा उमेदवाराचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात कार्यरत राहणार असून इतर कोणताही विचार मनात नसल्याचेही तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच वरिष्ठ नेत्यांना राजीनामा पाठवला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शैलेश वडनेरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हा राजीनामा चर्चेचा विषय ठरला आहे. वडनेरे यांचा हा राजीनामा पक्ष स्वीकारणार की त्यांची समजूत घालून त्यांना पक्षात पुन्हा शहराध्यक्षपदी सक्रिय केले जाणार? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. वडनेरे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
शनिवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बदलापूर भेटी दरम्यान बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार जोमाने सुरू असल्याचे वडनेरे यांनी नमूद केले होते. सर्व घटक पक्षांनी जोमाने प्रचार करण्याचे आवाहन उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांना केले होते आणि आज रविवारी श्री. वडनेरे यांच्या राजीनाम्याच्या प्रकारामुळे चर्चेला उधाण आले आहे.