राज्यात रिकव्हरी रेट 98.01 टक्के

मुंबई: राज्यात आज 1862 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2019 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहेत.

राज्यात आज सात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,93,764 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे.

राज्यात एकूण 12077 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3386.इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2235 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात 17 हजार 135 नवीन रुग्ण

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. मागील सलग चार दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मागील चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचं पाहायला मिळाला. गेल्या 24 तासांत 17 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी दिवसभरात 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 3 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 37 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.