पावसाचा जोर वाढला; भिंती कोसळून चाळी बाधित

ठाणे: मुंब्र्यातील दत्तवाडी येथील एका चाळीची संरक्षक भिंत कोसळल्याने १९ खोल्या धोकादायक अवस्थेत आल्या आहेत. येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान वंदना सिनेमाजवळील एसटीच्या विभागीय कार्यालयाची भिंत चाळीवर कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आज सोमवारी साडेपाचच्या सुमारास दत्तवाडी, मुंब्रा (प.) येथे अनिल भगत चाळीची अंदाजे १६ फूट लांब संरक्षक भिंत पडली. उर्वरित भिंत धोकादायक स्थितीत आहे. माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १- पीकअप वाहनासह पोहोचले. सुदैवाने घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंब्रा प्रभाग समितीमधील कर्मचाऱ्यांनी बाधित रहिवासी यांना जवळील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे.

चाळीमध्ये एकूण १९ खोल्या होत्या त्यामधील दोन खोल्या रिकाम्या होत्या व १७ खोल्यांमध्ये रहिवासी राहत होते. सदर ठिकाणी सर्व १९ खोल्या मुंब्रा प्रभाग समिती अतिक्रमण विभागामार्फत रिकाम्या करून सील करण्यात आल्या आहेत व सदर चाळीमधील रहिवाशांची तात्पुरती राहण्याची सोय ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ७७, मुंब्रा स्टेशन जवळ येथे करण्यात आली आहे.

तर रविवारी सायंकाळी वंदना एसटी विभागीय कार्यालयाची १० फूट लांब आणि पाच फूट उंच सुरक्षा भिंतीचा काही भाग पांचाळ चाळींमधील दोन घरावर पडला होता व उर्वरित भिंत धोकादायक स्थितीत आहे. माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा व उथळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १- पीकअप वाहनासह दाखल झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेत गोपाळ पांचाळ (५८) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. लक्ष्मी पांचाळ आणि उमा शंकर विश्वकर्मा यांच्या दोन खोल्यांचे पत्रे तुटून नुकसान झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पांचाळ चाळीमधील चार घरांना खाली करून त्यांना स्थलांतरित करण्याचे काम उथळसर प्रभाग समिती यांच्यामार्फत चालू आहे.