पावसाने भंबेरी उडवली; जेवणातली भाजीही बिघडली

ठाणे, कल्याण, नवी मुंबई बाजारात आवक घटली

ठाणे : चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भाज्यांची नासाडी झाली तर हाती आलेल्या भाज्या वाहतूक कोंडीत अडकल्याने मागणी विरुद्ध पुरवठा असे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पितृपंधरवड्यात भाज्यांचे दर कमी होतील असा व्यापाऱ्यांचा आणि ग्राहकांचा अंदाज फोल ठरला आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत भाज्यांची आवक घटली आहे. मागणीपेक्षा आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. पितृपक्षात आवश्यक असलेल्या लाल भोपळा, अळूची पाने कारले, गवार अशा भाज्यांचे भाव पाच ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात येईपर्यंत हे भाव तिपटीने वाढ होत आहे. अनंंत चर्तुशीपर्यंत पाळला जाणारा शाकाहार आणि त्यापाठोपाठ आलेला पितृपक्ष या काळात भाज्यांना वाढती मागणी आहे. पण गेल्या आठवड्यापासून अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेसह स्वयंपाकघराचे बजेटही कोलमडले आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक घटली आहे. त्यात रविवारी केवळ नऊ गाड्या भाजी बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढचे काही दिवस भाज्यांचा भाव चढाच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

कल्याण कृषी उत्पन्न बाजारातून घाऊक व किरकोळ व्यापारी भाज्या उचलतात. या भाज्या नागरी वस्तीत विक्रीसाठी ठेवताना भावात दुप्पट-तिप्पट वाढ करण्यात येते. त्यामुळे कल्याण बाजारपेठेत मिळणारी २० ते २५ रुपये किलो भेंडी ठाण्याच्या जांभळी बाजारात ७० रुपयांनी तर किरकोळ व्यापाऱ्यांकडे १०० रुपये किलोने विकली जात आहे. जांभळी नाक्यावरील बाजारात फ्लॉवर चक्क १२० रुपये किलोने विकला जात आहे. वांगी ८० रुपये किलो, कारली आणि लाल भोपळा ८० रुपये किलो तर गावठी काकडी १०० रुपये किलोने विकली जात आहे. पाले भाज्याही २० ते ३० रुपये जुडी अशी मिळत आहे. वडीसाठी लागणारी आळूची पाने २० रुपयांना चार ते पाच या भावात मिळत आहेत. पावसाने भाव वधारला असला तरी पितृपक्ष सुरू होणार असून त्यात भाज्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा कृषी उपन्न बाजार समितीमधील व्यापारी इस्माईल बागवान यांनी व्यक्त केली.

पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे हे भाव वाढले आहेत. भाज्यांना जास्त पाणी लागले तर भाज्या खराब होतात, त्यामुळेच शेतकरी भाज्या शेतातून काढत नाहीत. या सर्व गोष्टींमुळे भाज्या बाजारात कमी आल्याने त्यांचे भाव वाढले आहेत. पाऊस कमी झाला तर दोन तीन दिवसात भाव कमी होऊ शकतात, असे ठाण्यातील शिवाजी भाजी मंडईतील व्यापारी भगवान तुपे यांनी सांगितले.

कल्याण कृषी उत्पन्न बाजारभाव
पालक : १० ते १५ रुपये जुडी
मेथी : १५ ते २५ रुपये जुडी
भेंडी : २० ते २५ रुपये किलो
कोबी : १६ ते २० रुपये नग
भोपळा ( दुधी ) : 14 ते 18 रुपये
भोपळा ( डांगर) : 12 ते 16 रुपये
प्लावर : 16 ते 26 रुपये
शेपू : 10 ते 15 रुपये एक जुडी
कोथिंबीर : 10 ते 30 रुपये एक जुडी