मातृदिनीच गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त

संभाजीनगरमध्ये इंजिनिअरींग तरुणीच होती मास्टरमाईंड

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे आपण मातृदिन साजरा करत आहोत तर दुसरीकडे मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. यात गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

राहत्या घरी इंजिनिअरींग करणारी मुलगी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे. तीच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील तिरुपती नगर परिसरात ही कारवाई करण्यात आलीय. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आले.

आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता इंजिनिअरिंग करणाऱ्या एका तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी 12 लाख 78 हजारांची रोख रक्कम देखील मिळून आली. यावेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्याच आठवड्यात राज्यातील 22 जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदान आणि गर्भपात जोरात सुरु असल्याचं समोर आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि मुलींचे गर्भपात होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. त्यामुळे या 22 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणजे एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण चिंतादायकरीत्या घटल्याचे समोर आले आहे. तर जालन्यात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.