तातडीच्या कारवाईसाठी मनसेचा इशारा
ठाणे: ठाणे शहरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे हवामान बदलामुळे धोका वाढत असतानाच, दुसरीकडे ठाणे महानगरपालिका अजूनही पदपथावरील अनधिकृत जाहिरात फलकांवर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे.
एक वर्षापूर्वी घाटकोपरमध्ये जाहिरात फलक पडून १७ लोकांचा बळी गेला होता. या प्रकरणाला वर्ष उलटले तरी अद्यापही ठाणे महापालिका अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. २१ जून २०२३ रोजी वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचे आदेश जाहिरात विभागाने अतिक्रमण विभागाला दिले होते. मात्र, आजतागायत संबंधित ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, मनसेने या कारवाईच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा अनधिकृत फलकांमुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.
पदपथावरील या अनधिकृत जाहिरात फलकांबाबत ठाणे महानगरपालिकेने तातडीने कारवाई करण्याबाबतचे निवेदन पालिका प्रशासनाला दिले आहे.