शिक्षकाकडून मुख्याध्यापकाने घेतली लाच

ठाणे: भिवंडी येथिल शाळेतील शिक्षकांच्या दुय्यम सेवा पुस्तिकेमध्ये वेतन आयोगाने सुचवलेल्या नोंदी करण्यासाठी साठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ठाण्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याने शिक्षक वर्गात खळबळ उडाली आहे.

शहाजान मोहम्मदअली मौलाना, (54) असे शिक्षकाचे नाव आहे तर मुख्याध्यापकाचे नाव जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी (52) असे आहे. हे दोघेही रईस हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज येथे कार्यरत आहेत. या शाळेतील तक्रारदार शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना यांचे डुप्लीकेट सर्व्हिस बुक तयार करुन घेऊन व त्यावर वेतन आयोगानुसार नोंदी व शिक्के घेऊन देण्याकरीता शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना आणि मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी हे तक्रारदार यांचेकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार शिक्षकांनी ठाण्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे 19 मार्च 25 रोजी लेखी तक्रार दिलेली आहे.

20 आणि 21 मार्च 25 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान यातील शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना, यांनी तक्रारदार यांचे डुप्लीकेट सर्व्हिस बुक तयार करुन घेऊन व त्यावर वेतन आयोगानुसार नोंदी व शिक्के घेऊन देण्याकरीता तक्रारदार यांचेकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यास मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी यांनी शहाजान मोहम्मदअली मौलाना यांनी वरीलप्रमाणे मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेस दुजारा देवून सदरची लाच रक्कम देण्याकरीता तक्रारदार यांना प्रोत्साहीत केले व यातील शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याबाबत पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे काल 1मे रोजी करण्यात आलेल्या कारवाईत शहाजान मोहम्मदअली मौलाना यांना तक्रारदार यांचेकडून 60 हजार रूपयेे लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले असून मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी, यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. वर नमूद दोन्ही लोकसेवक यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक, अनुपमा खरे पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, महिला पोलीस हवालदार रुपाली देसाई, पोलीस नाईक बाळू कडव, पद्माकर पारधी, आणि विनोद जाधव यांच्या पथकाने केली.