कासारवडवली राममंदिर येथील तलावाचे होणार सुशोभीकरण

तलावात म्युझिकल फाऊंटन आणि घाट

ठाणे: १४ मार्च, २०२४ रोजी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरातील कासारवडवली राममंदिर येथील तलावावर काळे दगड वापरून घाटांचे बांधकाम करण्यात येणार असून त्या ठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसवून सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला.

ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, या तलावांचे सुशोभिकरण करून, जतन करून सांस्कृतिक वारसा जपणे गरजेचे आहे. त्यासाठी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कासारवडवली राममंदिर येथे असलेल्या तलावाजवळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी, फिरण्यासाठी, निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ-संध्याकाळी येत असतात. या तलावाचे जतन करण्याच्या दृष्टीने उपवन घाटाप्रमाणे या तलावाच्या किनाऱ्याला काळे दगड वापरून घाटांचे बांधकाम करण्यात येईल. त्या ठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसवून लाईटच्या आधारे लेझर शो करून या तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी निधी मंजूर करून आणला आहे.

या कामासाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी आमदार सरनाईक यांच्या मागणीनंतर मंजूर करण्यात आला होता. ’महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास“ या योजने अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याने राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे. आता या तलावाचे सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी विश्वास व्यक्त केला.

असे होणार तलाव सुशोभीकरण
या तलावामधील शक्य होईल तितका गाळ काढला जाईल आणि तलाव स्वच्छ केले जाईल. तलावातच विसर्जन व इतर धार्मिक विधी होत असल्याने तलावाची योग्य ती स्वछता वर्षभर राहत नाही. त्यामुळे या तलावाच्या जवळ धार्मिक विधी व विसर्जन करण्यासाठी छोटा २० बाय ४० फुटांचा वेगळा पॉन्ड तयार केला जाईल. तिकडे पायऱ्या बनवल्या जातील. म्हणजे त्या वेगळ्या पॉन्ड मध्येच विसर्जन आणि सर्व धार्मिक कार्यक्रम नागरिक करू शकतील व मुख्य तलाव हा सुरक्षित, स्वच्छ राहील, मुख्य तलावात कोणी उतरणार नाही. तलावाच्या परिसरात निसर्ग रम्य वातावरण तयार केले जाईल. तलावाच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत चांगले गार्डन तयार केले जाईल. या तलावाचे सुशोभीकरण केले जात असताना संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून संरक्षक रेलिंग लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांना बसण्यासाठी गजेंबौ, जॉगिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्यात येणार आहे.

याप्रसंगी माजी नगरसेवक सिध्दार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता घरत, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभा उपशहरप्रमुख कृष्णा भोईर, विभागप्रमुख दिलिप ओवळेकर, रवी घरत आदी उपस्थित होते.