शिवसेना नेते राजन विचारे यांचा आरोप
ठाणे: ठाण्यातील सिद्धेश्वर तलावात सांडपाणी आणि जलपर्णीने हजारो माशांचा बळी घेतला असला तरी या घटनेस ठाणे महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभागच जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे.
गुरुवारी सिद्धेश्वर तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी राजन विचारे यांनी आज पालिका आयुक्त सौरभ राव यांना पुन्हा निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. २२ जानेवारी रोजी पालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत तलावाची झालेली दुर्दशा दाखवण्यात आली होती. दरम्यान ७ फेब्रुवारीमध्ये ठाणे महापालिकेने गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू नाही
तलावाच्या संवर्धनासाठी ५ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव तयार केला होता. शासनाच्या मंजुरीनंतर काम सुरू करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नसल्याचा आरोप श्री.विचारे यांनी केला.
तलावातून दुर्गंधी पसरली असून दादांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करून कामे सुरू केली परंतु निधीअभावी कामे बंद पडली आहेत. या तलावात गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला गाळ उचलला जात नाही. पावसाळ्यात या भागातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले तर त्यास ठाणे महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे.