मसाला बाजारात छताचा प्लास्टर कोसळला

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजार आवारातील के आणि जे विंगच्या पॅसेजमधील छताचा प्लास्टर कोसळला आहे. ही घटना गुरुवारी घडली असून छताचा प्लास्टर कोसळला त्यावेळी त्याठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेने बाजारातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एपीएमसीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत आहे. कांदा-बटाटा बाजारात काही इमारती आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट आहे. मागील महिन्यात एपीएमसी सचिवांच्या दालनात छताचा प्लास्टर पडला होता. त्यादिवशी ईदची सुट्टी असल्याने सचिव थोडक्यात बचावले. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मसाला बाजारातील के आणि जे विंगमधील छताचा प्लास्टर कोसळला, मात्र यात कोणती जीवितहानी झाली नाही.

मागील काही वर्षांपासून कांदा-बटाटा बाजारातील कमानी आणि सज्जा कोसळण्याच्या घटना घडत आहेत. एपीएमसी बाजार आवारातील काही ठिकाणी छताला लोखंडी टेकू देऊन कारभार सुरू आहे. वर्षानुवर्षे बाजारातील इमारती धोकादायक यादीत समाविष्ट होऊन देखील या ठिकाणी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. याच दरम्यान बाजारातील छताचा भाग, सज्जा कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत.