ठाणे: मागील दोन आठवडे ठाणे शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात महापालिकेच्या घनकचरा विभागाला काही प्रमाणात का होईना, यश आलेले दिसत आहे. शहरात नव्याने निर्माण झालेले कचऱ्याचे स्पॉट देखील पुन्हा कमी झाले आहे, त्यामुळे ठाणेकरांचा पाडवा दुर्गंधीमुक्त होण्याची आशा आहे.
काही दिवसांपासून गृहसंकुल परिसरातील ठिकाणी आजही कचऱ्याची समस्या असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. परंतु तेथील कचरा उचलण्यासाठी आता अतिरिक्त डंपर आणि जेसीबी लावून कचरा उचलला जात असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.
ठाणे शहरात मागील १५ दिवसांपासून कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केले होते. दिवा येथिल डम्पिंग आणि डायघर प्रकल्प बंद झाल्यामुळे सीपी तलाव हस्तांतरण स्थानकाच्या ठिकाणी वाढलेल्या कचऱ्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शहराची कचरा कोंडी झाली होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने अखेर आपला मोर्चा भिवंडीतील आतकोली येथे वळविला आहे. या ठिकाणी सध्या रोजच्या रोज कचरा डम्प केला जात आहे. या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
दुसरीकडे शहराच्या विविध भागात असलेले कचऱ्याचे स्पॉट आता काही प्रमाणात कमी होण्यास सुरवात झाली आहे. किंबहुना यापूर्वी बंद असलेल्या स्पॉटवर देखील कचऱ्याचे ढिग दिसत होते. ते देखील आता कमी झाले असल्याचे दिसून आले आहे. रोजच्या रोज शहराच्या विविध भागात घंटागाड्यांसह आता डंपर देखील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या दिमतीला जेसीबी लावण्यात आला आहे, त्यामुळे हा कचरा थेट डंपरमध्ये जमा केला जात आहे. तेथून तो सीपी तलाव किंवा गायमुख किंवा अन्य ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात टाकून पुढे आतकोलीला घेऊन जात असल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले.
सीपी तलाव येथे साचलेला कचरा कमी करण्याचे देखील महापालिकेचे प्रयत्न असून त्यानुसार आता येथील एक लाख मेट्रीक टन कचऱ्यापैकी १५ हजार मेट्रीक टन उचलला गेला असून तो थेट आतकोलीला पाठविण्यात आला आहे.