ठाणे: भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक ३७ टक्के मतदार कुणबी समाजाचे असले तरी या समाजातील एकगठ्ठा मतांचा फायदा कोणत्याही उमेदवाराला झाला नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे कुणबी उमेदवार विजयी होण्याची शक्यता नसून मतविभागणीमुळे खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच होणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मते २१ टक्के आहेत. ३७ टक्के कुणबी मते आहेत. २७ टक्के दलित व अन्य तर १५ टक्के आगरी मतदार आहेत. मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजप उमेदवार खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळया मामा म्हात्रे यांच्यात लढत आहे. हे दोघेही उमेदवार आगरी समाजाचे आहेत. कुणबी समाजाच्या मतांची गोळाबेरीज करण्यात सध्या विद्यमान खासदार कपिल पाटील यांना यश आल्याचे दिसते. कुणबी सेनेने त्यांना पाठींबा जाहिर केला आहे.
या मतदारसंघामध्ये कुणबी मतदारांचा वरचष्मा असून त्यांच्याच हातामध्ये उमेदवारांचे भवितव्य आहे. मुस्लिम आणि दलित मते ही भाजपच्या बाजूने पडत नसल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. एमआयएम, वंचित, आयपीआय, सपा, बसपा आणि अपक्ष उमेदवारांमध्ये ती विभागली जात असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे कुणबी व आगरी या एकगठ्ठा मतांवरच भिवंडीची निवडणूक आतापर्यंत होत आलेली आहे. यामध्ये खासदार कपिल पाटील हे आगरी समाजाचे असले तरी त्यांना आता कुणबी सेनेची साथ मिळाली आहे. त्यामुळे कुणबी समाजाचे अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांचे कुणबी मतांचे गणित लढतीआधीच कोलमडले आहे. दुसरीकडे सुरेश उर्फ बाळया मामा यांची मोट आगरी समाजासह मुस्लिमांच्या मतांवर आहे.
महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी आतापर्यंत प्रचारात आघाडी घेतली आहे. काल बुधवारी १५ मे रोजी खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहिर सभा झाली. तर त्यापूर्वी सुरेश म्हात्रे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहापूर व कल्याण पश्चिम येथे सभा घेतली. दोन्ही उमेदवारांसाठी त्यांचे नेते मैदानात उतरले आहेत. एकूण चित्र पाहता या दोन उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मतदारसंघामध्ये महायुती, महाविकास आघाडी, बसप, छोटे मोठे पक्ष, अपक्षांसह २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथे २० लाख ७२,३१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र मतदानाच्यावेळी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे.
२००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजाचे असताना कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांना पराभव पत्करावा लागला. आता २०२४ मध्ये त्यांनी निवडणूक न लढवता भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे कुणबी सेनेला मानणार्या मतदारांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, मुरबाड, शहापूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये कुणबी समाज हा प्रामुख्याने मुरबाड व शहापूरमध्ये आहे. त्यामुळे येथील मतदारांची मते कुणाच्या झोळीत पडणार हे पहावे लागेल.