* ‘मजीप्रा’ने दिली ना हरकत
* मासुंदा परिसराची कोंडी सुटणार
ठाणे : अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गडकरी रंगायतनजवळील भूखंडावरील आपला गाशा गुंडाळण्याची तयारी केली असून त्यांनी ना हरकत दिल्यामुळे ठाणे महापालिकेचा पार्किंग प्लाझाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे स्थानक, मासुंदा तलाव आणि गडकरी रंगायतन परिसरातील वाहतूक कोंडी फोडून हक्काचे वाहनतळ मिळावे यासाठी प्रस्तावित असलेल्या पार्कींग प्लाझाचा तिढा सुटणार आहे. गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भुखंडावर हे प्रस्तावित वाहनतळ आहे. हा भुखंड पालिकेला देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ना हरकत दिली असून महसूल विभाग भूखंड हस्तांतरण करणार असल्याने महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण बैठकीत प्रस्ताव मंजूर केला असून या वाहन तळाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे असलेल्या या पार्कींग प्लाझाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे स्थानक गाठण्यासाठी रोज हजारो वाहने परिसरात दाखल होतात. त्यात रिक्षा आणि बसेसची संख्याही लक्षणीय आहे. या वाहनांना हक्काचे पार्कींग मिळावे यासाठी गावदेवी मैदानाखाली प्रशस्त वाहनतळ उभारण्यात आले आहे. पण वाहनांची संख्या पाहता भविष्यात हे वाहनतळ अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यातच जांभळीनाका मंडई, गडकरी रंगायत आणि मासुंदा तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी येणार्यांची संख्या पाहता या ठिकाणी पार्कीग प्लाझाची निकडीची गरज भासत आहे. म्हणून २०१९ मध्ये महासभेत ठराव करून गडकरी रंगायतन शेजारी असेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा विस्तिर्ण भुखंड हस्तांरित करून तेथे तळ आधिक एक मजल्याचे पाकींग प्लाझा उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
या वाहनतळामुळे मासुंदा तलाव, जांभळीनाका, टेंभीनाका परिसरातील रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम बसणार असून या भागातील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
जीवन प्राधिकरणाचे नवीन प्रस्तावित कार्यालय आणि निवास स्थानासाठी बाळकूम येथिल भूखंड देण्यात आला आहे.
पार्कींग प्लाझावर प्रेक्षक गॅलरी
प्रस्तावित पार्किंग प्लाझा तळ आणि एक किंवा दोन मजल्याचा असणार आहे. येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्कींग व्यवस्था असेल. त्यामुळे गडकरी रंगायतन येथे नाटक पाहण्यासाठी किंवा सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी नागरिकांच्या वाहनतळाची समस्या सुटणार आहे. या शिवाय मासुंदा तलाव परिसरातील अवैध पार्किंगलाही आळा बसणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या पार्कींग प्लाझावर एक खुली प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे पालिकेचे नियोजन असल्याच समजते. या गॅलरीत उभे राहिल्यावर मासुंदा तलाव परिसराचे वैभव दिसणार आहे.