ठाणे : नवी मुंबई, न्हावा-शेवा येथून घोडबंदर रोडमार्गे पंजाबला निघालेला २७ टन केमिकल असलेला कंटेनर मंगळवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उलटला. ही घटना पातलीपाडा ब्रिजजवळ घडल्याने तब्बल चार तास उलटलेल्या कंटेनरने घोडबंदर रोड रोखून धरला होता.
अखेर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कंटेनर रोडच्या एका बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
कंटेनर चालक शिवेंद्र सिंग हे मंगळवारी मध्यरात्री नवी मुंबई न्हावा शेवा येथून घोडबंदर रोडमार्गे पंजाबला ओझोन केमिकल असलेला कंटेनर घेऊन निघाला होता. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिजजवळ आल्यावर कंटेनरचालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने तो कंटेनर मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास उलटला. याचदरम्यान काही प्रमाणात कंटेनरमधून केमिकल गळती होण्यास सुरुवात झाली, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित केमिकल कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिली.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस, ठामपा आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तर, या अपघाताने घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवरील पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड वाहतुकीसाठी सुमारे साडेचार तास बंद केला होता. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तो अपघातग्रस्त कंटेनर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मार्फत दोन हायड्रा मशीनच्या मदतीने सुमारे ४ तासानंतर रोडच्या एका बाजूला करण्यात आला. त्याच्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.