२७ गावांतील संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उबाठाचे आधीच कॉंग्रेसीकरण-मुख्यमंत्री

ठाणे : प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हायला हवे, शरद पवारांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांनी हार मानली आहे का? उबाठा तर आधीपासूनच लीन होती, ती सुध्दा कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकते. उबाठाचे कॉंग्रेसीकरण २०१९ मध्येच झाले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे.

ठाण्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी गुरुवारी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील संघर्ष समितीचे दत्ता वझे, गुलाब वझे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टीका केली.

मागील १० वर्षात केलेल्या विकासकामांमुळेच कल्याण-डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी खऱ्या शिवसेनेत येत असल्याचेही ते म्हणाले. महाविकास विकास आघाडीला त्यांचा पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी वक्तव्य केली जात असल्याचेही ते म्हणाले.

२० तारखेला शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी आहे. यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आतपर्यंत झालेल्या तीनही टप्यातील निवडणुकीत महायुती आघाडीवर असल्याचेही ते म्हणाले. महायुतीची सभा हा शिवाजी पार्कवर होईलच असेही सांगतांना मोदी यांचा रोड शो होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तयार असल्याचेही ते म्हणाले.