नवीन रुग्णांचा आकडा ५०वर

ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा तळाशी आला आहे. आज ५० नवीन रुग्णांची भर पडली आहे तर २६३जण कोरोनामुक्त झाले आहेत. एक जण दगावला असून रुग्णालयात अवघे दोन जण व्हेंटिलेटरवर असून ९३जण उपचार घेत आहेत.

महापालिका हद्दीतील कोरोना हॉट स्पॉट असलेल्या प्रभाग समिती क्षेत्रातील सर्वात जास्त २६ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीमध्ये सापडले आहेत. आठ रूग्ण उथळसर, पाच जण वर्तकनगर आणि तीन रूग्ण नौपाडा-कोपरी प्रभाग समिती परिसरात वाढले आहेत. प्रत्येकी दोन रूग्ण लोकमान्य-सावरकर नगर, वागळे प्रभाग आणि कळवा प्रभाग समिती भागात नोंदवले गेले आहेत तर सर्वात कमी एका रुग्णांची नोंद दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती भागात झाली आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २६३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ७८,९३१जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १,६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत दोन हजार १२२जण दगावले आहेत.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,११३ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ५०जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २३ लाख ५४,५५८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८२,७०९जण बाधित मिळाले आहेत.