आली समीप घटिका निवडणुकीची…

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

ठाणे : ठाणे महापालिकेसह राज्यातील १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घटिका समीप आली असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वीचा प्रभागनिहाय नवीन मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली आहे. या महापालिकांवर सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यावरील हरकती-सूचना स्विकारुन त्याची सुनावणी घेण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यानंतर ३१ मे रोजी महिला आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यावरील हरकती घेणाऱ्या निवडणूक आयोगाने उत्तर पाठवले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोग प्रभागनिहाय नवीन मतदार याद्या तयार करतात. एका प्रभागातील मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले तर त्यावर हरकत घेण्याची संधी मतदार आणि उमेदवाराला असते. त्या करिता निवडणूक विभागाने २३ जून रोजी मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकत घेण्याची १ जुलै ही अंतिम तारीख ठेवली आहे. ७ जुलै रोजी हरकत आणि सूचनांची अंमलबजावणी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही निवडणूक विभागाची अंतिम प्रक्रिया असून त्यानंतर निवडणूक विभाग कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करून मतदानाची तारीख जाहीर करण्यास तयार असणार आहे.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे, त्यामुळे पावसाळा संपताच निवडणूक आयोग मतदानाची तारीख जाहीर करू शकतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.