दोघांना नव्या व्हेरियंटची बाधा; सोसायटीमध्येही होणार चाचण्या

ठाणे : ठाण्यात कोरोनाच्या नवीन बी ए ५ व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले असून ते घरीच उपचार घेऊन बरे झाले आहेत. खबरदारी म्हणून हे रुग्ण ज्या गृहसंकुलात वास्तव्यास होते त्या ठिकाणचा सर्व्हे आता पालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. तसेच येथील रहिवाशांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

ठाण्यात दररोज १५० ते २५०च्या दरम्यान कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. महापालिका हद्दीत आतापर्यंत एक लाख ८६,२५२ रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक लाख ८२,७०५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत २,१३१ जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या १,४१६ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. यातील ५५ रुग्णांवर कोवीड सेंटरवर उपचार सुरु आहेत. तर २९ जणांना सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत. तर एक रुग्ण आयसीयु आणि चार रुग्ण ऑक्सीजनवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर १ हजार ३२७ रुग्णांवर घरीच उपचार सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या नव्या बी ए ५ या व्हेरीयंटचे दोन रुग्ण ठाण्यात आढळले होते. त्यात २५ वर्षीय आणि ३२ वर्षीय पुरुषांचा समावेश होता. ते दोघे २८ व ३० मे या कालावधीत कोवीड बाधीत झाले होते. परंतु ते दोघेही गृहविलगीकरणात बरे झाले आहेत. आता खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध सुरु केला आहे. तसेच ते ज्या सोसायटीत वास्तव्यास होते, त्या ठिकाणच्या आजबाजूच्या नागरीकांचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.