ठामपाच्या अर्थसंकल्पात तरतूद
ठाणे : ठाणेकरांना पुढील काही दिवसात मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाणार आहे. पिसे येथील पंपिंग स्टेशन येथे ज्यादा क्षमतेचे पंप बसवण्यात येणार असल्याने १०० दशलक्ष लिटर जास्त पाणी ठाणेकरांना मिळणार आहे.
ठाणे शहराला मुंबई महापालिका, एमआयडीसी स्टेम प्राधिकरण आणि स्वतःच्या योजनेतून दरदिवशी ४९५ दशलक्ष लिटर इतक्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. पिसे येथे महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून दरदिवशी २०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा शहराला केला जातो. येथील पंपिंग स्टेशनमध्ये ६०० अश्वशक्तीचे पाच पंप आहेत. या पंपाची क्षमता कमी असल्याने नदीत मुबलक प्रमाणात पाणी असतानाही ते उचलले जात नव्हते, त्यामुळे ठाणे महापालिकेने २८ कोटी रुपये खर्च करून पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये १,१५० अश्वशक्तीचे पाच नवीन पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी तीन पंप बसवूनही झाले आहेत. पाच पंप बसविण्यात आल्यानंतर शहराला दरदिवशी ५९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक घरात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर पाण्याचे स्मार्ट मिटर लावून योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. जेवढे पाणी वापरण्यात येईल तेवढे पाण्याचे बिल येऊन पाण्याचा अपव्यय टाळला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.
मुंब्रा येथील पाण्याचे रिमॉडलिंग करण्यात आले आहे तर दिवा येथील रिमॉडलिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. या सर्व योजनांमुळे ठाणेकरांची पाण्याची समस्या दूर केली जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी त्याबाबत तरतूद केली आहे.