‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला !

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे गटाकडे राहील, असे आज निवडणूक आयोगाने जाहीर केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. या निर्णयानंतर ठाणे, मुंबईसह राज्यभर शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आला.

शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती.  या सुनावणीवर आयोगाने आज अखेर निकाल दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यापासून धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली. यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. सुनावणी दरम्यान, दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निकाल दिला आहे.  काही महिन्यातच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरच आज आयोगाने चिन्हावर निर्णय दिला आहे.

निवडणूक आयोगाने नोंदवलेली निरीक्षणे

2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत.

शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 यांनी पक्ष घटनेतील काही बदल हे लोकशाही मूल्याशी सुसंगत नव्हते. त्यावेळी निवडणूक आयोगाने हे बदल नाकारले होते. निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर पक्ष घटना ही अधिक सुसंगत करण्यात आली. लोकशाही विरोधी असलेले बदल पुन्हा गुप्तपणे पक्ष घटनेत करण्यात आले. त्यामुळे पक्ष हा एका कुटुंबाची मालमत्ता झाली असल्याचे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले.

पक्षाची संसदीय ताकद कोणासोबत?
एकनाथ शिंदे यांच्याकडे 67 पैकी 40 आमदार आहेत. तर, लोकसभेतील 13 खासदार शिंदे गटासोबत आहेत. तर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसभेतील 7 खासदार, राज्यसभेतील 3 खासदार आणि विधानसभेतील 13 आमदार सोबत आहेत. विधान परिषदेतील आमदारही ठाकरे यांच्या सोबत आहेत.