थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळाले!

* १७८० नळ जोडण्या खंडित
* १५२ मोटर पंप जप्त
* ५० पंप रुम सील
* ३३५४ थकबाकीदारांना नोटीसा
* ५९.४३ कोटी रुपयांची वसुली

ठाणे: ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७८० नळ जोडण्या खंडित केल्या असून १५२ मोटर पंप जप्त केले आहेत.

एकूण ५० पंप रुम सील करण्यात आले असून थकबाकी वसुलीसाठी ३३५४ थकबाकीदार ग्राहकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ५९.४३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, आयुक्तस्तरावर या वसुलीबाबत सातत्याने आढावाही घेतला जात आहे.

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बील वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

प्रभाग कारवाई वसुली

माजिवडा-मानपाडा : ८० – ११,३८,१३,५७२
नौपाडा – कोपरी : १०० – ०७,७९,१४,४५८
वर्तकनगर : ८९ – ०५,९८,१५,४६७
उथळसर : १४९ – ०५,४१,४९,२१५
कळवा : १८२ – ०५,२०,२३,४७३
वागळे : ३५४ – ०२,८२,९५,०७८
लोकमान्य- सावरकर : १७८ – ०४,४६,६८,५८७
मुंब्रा : ३३३ – ०४,९५,९३,१०३
दिवा : ३१५ – ०४,८०,१०,९८५
मुख्यालय-सीएफसी ०० – ०६,६०,७१,८६९
……………………………………
एकूण : १७८० – ५९,४३,५५,८०७

थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट

महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडात १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना १ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील.