बेकायदा बंगले-हॉटेल आणि ढाब्यांच्या तोंडचे पाणी पळाले; ठाणे महापालिकेने येऊरमध्ये ५२ नळजोडण्या तोडल्या

ठाणे: येऊर येथे बेकायदेशीरपणे नळजोडण्या घेणाऱ्या धनदांडग्यांच्या विरोधात ठाणे महापालिका आक्रमक झाली आहे. काल एकाच दिवशी ५२ बंगले, हॉटेल यांच्या नळजोडण्या खंडित करून त्यांना दणका दिला आहे

निसर्गरम्य येऊर येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागाला पाणीपुरवठा केला जातो, परंतु तेथील आदिवासींच्या घरातील घागर मात्र कोरडीच आहे. या भागातील हॉटेल, धनदांडग्यांचे बंगले, तरण तलाव यांना मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचा निषेध करत येथील काही नागरिक उपोषणाला देखील बसले होते. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती

काल पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समितीचे पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मुरलीधर भोये यांच्या पथकाने येऊर परिसरातील बेकायदेशीरपणे घेतलेल्या जलवाहिन्या शोधण्याची मोहीम राबवली होती. त्या दरम्यान बंगले, हॉटेल, लॉज, तरण तलाव यांच्या जलवाहिन्यांची तपासणी केली असता ५२जणांनी विना परवाना नळ जोडणी केल्याचे निदर्शनास आले. महापालिकेने या नळजोडण्या तोडण्याची कारवाई केली असून बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, त्यामुळे धनदांडग्यांचे धाबे दणाणले आहे.

येथील बंगल्यात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जात आहे. तरण तलाव पाण्याने ओसंडून वाहत आहेत, परंतु आदिवासींच्या घरात पाणी नाही. येथील पाड्यावर राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या कारवाईमुळे तरी त्यांना पाणी मिळेल अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कारवाई झालेले बंगले, हॉटेल लॉज हे प्रतिष्ठित लोकांचे असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल का? असा सवाल या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.