* ग्रामीण भागात पूरस्थिती
* रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा पूर
* ठाणे शहरात पाणी तुंबले
ठाणे : काल जिल्ह्याला झोडपल्यानंतर रात्री ठाण्यासह कल्याण-डोंबिवली शहरी भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. ठाण्यात सोमवारी पहाटे अवघ्या चार तासांत १०४ मिमी पावसाची नोंद झाली तर दिवसभरात २५ मिमी पाऊस पडला. याचा फटका रेल्वे सेवेला बसून कर्जत, कसारा, बदलापूरपासून ते ठाणेपर्यंतच्या स्थानकांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळाली.
जूनमध्ये अपेक्षेप्रमाणे ओढ दिलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून जोरदार कम बॅक करण्यास सुरुवात केली आहे. शनिवार, रविवार जोरदार पावसाने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याचे दिसले. शहापूर, मुरबाडमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. मात्र ठाण्यासह शहरी भागामध्ये पावसाचा जोर पहायला मिळाला नव्हता. पण रात्री दिडच्या सुमारास पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये रविवारी रात्री साडे नऊ ते सोमवारी सकाळी साडे आठपर्यंत १२७ मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे मध्यरात्री दिड ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत तब्बल १०४.३९ मिमी पाऊस पडला.
आंबेडकर रोड, उथळसर, वंदना सिनेमा, मुख्य बाजारपेठ आदी ठिकाणी पाणी तुंबले होते. मध्यरात्री ठाणेकर साखरझोपेत असल्यामुळे पावसाची तीव्रता जाणवली नाही. पण पहाट होताच नियमित कामकाजासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी पावसाचा जोर कमी असतानाही रेल्वे स्थानकांवर मात्र प्रवाशांचा महापूर लोटला होता. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. मुंबईकडे जलद मार्गांवरून लोकल सोडण्यात येत नव्हत्या. त्या सर्व धिम्या गतीच्या मार्गांवरून जात होत्या त्यामुळे लोकल पकडण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
मुंबईची लोकल सेवा कोलमडून पडल्याने अनेकांनी रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला, परंतु महामार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. मुलुंड टोल नाक्यापासून कोपरी पुलापर्यंत गाड्याच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ठाण्यात सकाळी ८.३०ते संध्याकाळी ६.३० पर्यंत अवघा २५.६२ मिमी पाऊस पडला. आत्तापर्यंत शहरात ८९१. ६० पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात ९४१.७५ मिमी पाऊस झाला होता.