आ. प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधीवर राज्याची सकारात्मक भूमिका
मुंबई : ठाण्यातील कासारवडवली आणि मोघरपाडा येथील स्थानिक भूमिपुत्र आणि बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कासारवडवली येथे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रोसाठी टाकण्यात आलेले आरक्षण तसेच गायमुख – कासारवडवली ते वडाळा या मेट्रो-४ च्या कारशेडसाठी मोघरपाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी २२ मार्च, २०२२ रोजी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यास शासनाच्या वतीने छापील उत्तर देण्यात आले होते.
परंतु, त्यावर आमदार प्रताप सरनाईक यांचे समाधान झाले नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विकास कामांसाठी आगरी-कोळी समाजाचे फार मोठे योगदान असून महानगरपालिकेला त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे या शहराचा विकास झाला असे नमूद केले. त्यामुळे कासारवडवली व मोघरपाडा येथील भुमिपुत्रांना न्याय मिळावा व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कारशेडसाठी जात आहेत. त्यांना विकसित जमिन स्वरूपातच योग्य मोबदला मिळावा, असा आग्रह लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासामध्ये आगरी-कोळी समाजाचे फार मोठे योगदान असल्याचे कबुल केले. विकास कामे करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर व स्थानिक भुमिपुत्रांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, ही शासनाची भूमिका असून याबाबतीत लवकरच कासारवडवली व मोघरपाडा येथील शेतकऱ्यांबरोबर एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल व त्यांना विश्वासात घेऊनच कारशेडबाबतचा अंतीम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.