ठाणे : राज्यभरात भव्य आणि नाविन्यपूर्ण म्हणून प्रसिद्ध असलेल्या `विहंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या मंगळागौर-२०२३ ची ऑडिशन राऊंड उत्साहात पार पडली. या ऑडिशनबरोबरच २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत.
विहंग ट्रस्टच्या वतीने `विहंग पाम क्लब’मध्ये शनिवारी मंगळागौरी उत्सवासाठी ऑडिशन राऊंड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राच्या विविध भागांतून महिलांचे ग्रूप ऑडिशनसाठी आले होते. या राऊंडसाठी `झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेतील मुख्य नायिका ‘मुक्ता’ म्हणजेच अभिनेत्री सानिया चौधरी हिच्याबरोबरच शिवप्रिया शंकर, तृषाली फडाले, सुमित निषाद, मिलिंद शंकर कुर्ले यांनी परीक्षक म्हणून महिलांना अनेक टीप्स दिल्या. यावेळी सानियाबरोबरच परीक्षकांनी स्पर्धकांबरोबर मनमोकळा संवाद साधला.
पारंपरिक व आधुनिक (फ्यूजन) कॅटेगरीत उतरलेल्या विविध गटांनी अत्यंत मेहनतीने व कसून सराव केलेली विविध गीते सादर केली. काही महिलांनी सादर केलेल्या नृत्याने सभागृहातील उपस्थित महिलांनीही ठेका धरला. अनेक प्रकारच्या फुगड्या, झिम्मा, किसबाई किस, दिंड्यामोड, गोफ, पिंगा, गिरकी आदी खेळांमधून रंगत वाढत गेली. या वेळी स्पर्धकच स्वत:चे स्पर्धक झाले असल्याएवढी चुरस पाहावयास मिळाली.
या स्पर्धेत ४० वर्षांवरील महिलांसाठी प्रथमच भारतीय नृत्यपरंपरेवर सोलो डान्स स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यात काही महिलांनी दाखविलेला नृत्याविष्कार वाखाणण्याजोगा होता. अभिनेत्री सानिया चौधरी हिने निकाल जाहीर केला.