मॅनेजरनेच मारला दीड कोटीच्या साहित्यावर डल्ला

नवी मुंबई : तुर्भेमधील साई फ्युचर इंडिया कंपनी दुसरीकडे स्थलांतरित होत असल्याचा फायदा घेत ॲडमीन मॅनेजरने असिस्टंट मॅनेजरची खोटी सही करून स्थलांतरित करण्यात येणारे दीड कोटीहून अधिक किमतीचे सामान लंपास करून विक्री केली.

ही बाब निदर्शनास येताच कंपनीच्या मालकाने तुर्भे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करीत असताना तुर्भे पोलिसांनी सापळा रचून ॲडमीन मॅनेजर पराग सावंत आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास एक कोटी ६१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या घटनेत अजून कुणी सामील आहे का, याचा तपास तुर्भे पोलीस करत आहेत, अशी माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.