अधिकृत डॉक्टरांची यादी ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावावी

उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांचे निर्देश

ठाणे : बोगस डॉक्टरांवर आळा बसावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या नावांची यादी दर्शनी भागात लावावी. प्रत्येक ग्रामसभेत अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची नावांचे वाचन करावे, अशा सूचना सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, पोलीस उपअधीक्षक श्री. मुणगेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस, तालुका आरोग्य अधिकारी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

मुरबाड तालुक्यात झालेल्या बोगस डॉक्टरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत बोगस डॉक्टर शोध मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेने तालुक्यातील अन्य यंत्रणेशी समन्वय करून प्रभावीपणे ही मोहिम राबविण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी दिल्या. ग्रामीण भागात विशेषता आदिवासी वस्ती, पाड्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृतीवर भर द्यावा स्थानिक बोलीभाषेत त्यांना ही माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गावात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावात अधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादीचे वाचन करावे जेणेकरून ग्रामस्थांना त्याची माहिती मिळू शकेल त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात फलकावर गावातील अधिकृत वैद्यकीय व्यवसायांची नावे लिहावीत त्यामुळे ग्रामस्थांना योग्य माहिती मिळेल. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावातील, तालुक्यातील अन्य विभागाच्या समन्वयातून ही कारवाई करण्याचे श्री. ठोंबरे यांनी सांगितले. दरमहा तालुका यंत्रणेची आढावा घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात सर्वाधिक ११ बोगस डॉक्टरांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून कल्याण आणि मुरबाड तालुक्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे.