प्रदर्शनातून समोर येणार ३५ स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास
ठाणे : ठाणे जिल्ह्यातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती, दुर्मिळ छायाचित्रे, पत्र यांसारख्या विविध गोष्टींचे प्रदर्शन ठाण्यातील टाऊन हॉल येथे १२ ऑगस्टनंतर भरविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांसमोर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा जीवनपट या प्रदर्शनातून उलगडला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून सर्व माहिती आणि दुर्मिळ छायाचित्र संग्रहित करण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले आहे. घरोघरी तिरंगा अभियान आणि स्वराज्य महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
देशात आणि राज्यात व्यापक स्तरावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत, महापालिका, नगरपालिका यांच्या हद्दीतील १७ लाख घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाकडून ठरविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रभातफेरी, मॅरेथॉन, सायक्लोथॉन, संगीत कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा यांसारख्या कार्यक्रमांचे जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जिल्ह्यातल्या ३५ स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग नोंदविला होता. यासर्व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती, दुर्मिळ छायाचित्रे, पत्र यांसारख्या विविध गोष्टींचे प्रदर्शन ठाण्यातील टाऊन हॉल येथे १२ ऑगस्टनंतर भरविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसमोर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या सैनिकांचा जीवनपट या प्रदर्शनातून उलगडला जाणार आहे. या प्रदर्शनातून ठाण्याचा स्वातंत्र्यलढयातील सहभागाविषयी नागरिकांना माहिती मिळणार आहे. तसेच १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील टाऊन हॉल, दुर्गाडी किल्ला, अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर यांसारख्या ऐतिहासिक वास्तुंना विद्युत रोषणाई तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाणे मध्यवर्ती कारागृह मधील काही भागाला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तर काही भाग नागरिकांना भेट देण्यासाठी खुला करण्याबाबत जिल्हा प्रशासन विचाराधीन असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.
टॉक शो मधून उलगडणार ठाण्याचा इतिहास
या अभियानामध्ये आयोजित टॉक शो या उपक्रमातून ठाणे जिल्ह्याचा इतिहास उलगडून सांगण्यासाठी तब्बल ७५ नामांकित व्यक्ती आणि मूळ ठाणेकर असलेले ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत. टाऊन हॉल येथे या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना देशभक्तीपर गीतांची पर्वणी १५ ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी ११ ते २ या कालावधीत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.