बाटलीत तोंड अडकलेल्या बिबट्याची अखेर सुटका

वनविभागाकडून दोन दिवस शोध मोहीम

अंबरनाथ : दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पाण्याच्या बाटलीत तोंड अडकलेल्या बिबट्याचा शोध घेण्यात वन विभागाला यश आले असून मंगळवारी सायंकाळी या बिबट्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकाच्या मदतीने वनविभागाने सुटका केली आहे.

दोन दिवस अन्न-पाण्याविना फिरणाऱ्या या बिबट्याच्या बछड्याची  प्रकृती खालावली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वन विभाग अधिकारी, कर्मचारी तसेच पॉज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.

वांगणी नजीकच्या गोरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या बछड्याचे डोके पाण्याच्या प्लास्टिकच्या भांड्यात अडकले होते. गेल्या दोन दिवसांपासून हा बिबट्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी भटकत होता. वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथक त्याची सुटका करण्यासाठी त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गोरेगाव भागातच बिबट्या आढळून आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथकाने त्याला बेशुद्ध करत ताब्यात घेतले. त्यानंतर भांड्यापासून त्याची सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून अन्नपाण्याविना फिरणाऱ्या या बिबट्याची प्रकृती खालावल्याची माहिती उपवनसंरक्षक तुळशीराम हिरवे यांनी दिली आहे. त्यामुळे घटनास्थळी रुग्णवाहिकेत त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हिरवे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्लास्टिकच्या भांड्यात डोके घेऊन फिरणार्‍या बिबट्याची अखेर सुटका झाली आहे.