नवी मुंबईकर कांबळे दाम्पत्याला मिळाला श्रीराम महापूजेचा मान

नवी मुंबई: २२ जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरातील ११ जोडप्यांना या महापूजेचा मान मिळाला आहे. यात नवी मुंबईतील खारघर सेक्टर २० मध्ये राहणाऱ्या कांबळे दाम्पत्याचा देखील समावेश आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत.

विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते, त्यांनी १९९२ साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. विठ्ठल कांबळे हे एक शिक्षक असून आरएसएसचे रायगड जिल्हा सचिव देखील आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील महत्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती. मात्र त्यांनाच निमंत्रण येईल आणि ते देखील थेट रामलल्लांच्या पूजेचा मान मिळेल अशी कल्पना देखील त्यांनी केली नव्हती. त्यामुळे आयुष्याचे सार्थक झाले अशी प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या पत्नी उज्वला कांबळे यांनी हे सगळं अद्भुत असून आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने महाराष्ट्राची पैठणी साडी नेसून रामलल्लांच्या पूजेला बसणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.