ठाणे: सहा वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेचा टीएमटी अंतर्गत असलेला आधुनिक तंत्रज्ञाानाची सुविधा देणारा तसेच पालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये असलेला आयटीएस (इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प अखेर गुंडाळण्याच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे.
या प्रकल्पामध्ये तब्बल दोन कोटी ६५ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अखेर पालिका हा प्रकल्प सुरू करण्याच्या मनस्थितीत नसून घोटाळ्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी समोर आणली आहे.
ठाण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम हा प्रकल्प गेले कित्येक वर्ष बंद स्थितीमध्ये होता. अखेर या प्रकल्पाला पालिकेकडूनच टाळे लावले जात आहे. सहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम महानगरपालिकेच्या वतीने केपीएमजी ऍडव्हायझरी सर्विसेस या कंपनीला देण्यात आले होते. पण गेल्या सहा वर्षांमध्ये या कंपनीच्या वतीने अजून प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही व तो अपूर्ण स्थितीत आहे. तसेच प्रकल्पामध्ये खोटे काम झाल्याचे भासून महानगरपालिकेच्या अधिकारी व ठेकेदारानी संगनमत करून घोटाळा केल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.
दरम्यान या प्रकल्पात प्रत्येक टप्प्यात भ्रष्टाचार होऊन सुद्धा महापालिकेचे अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची ठेकेदारावर कारवाई केली नसून त्याला फक्त पाठीशी घालण्याचे काम महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे. प्रकल्पामध्ये २६ लाखांचे एलसीडी टीव्ही चोरीला गेल्याचे ठेकेदारांनी सांगूनसुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी साधी टीव्हीच्या चोरीची चौकशी देखील केली नाही. किंवा ठेकेदाराला टीव्ही चोरीला गेल्याची रीतसर पोलीस तक्रार दाखल केली आहे का याबद्दल विचारणाही केलेली नाही.