मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत न्यावा

आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी

बदलापूर: मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत नेऊन मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याचबरोबर सत्ताधारी समाजांमध्ये भांडण लावून राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या संवाद दौऱ्यानिमित्त बदलापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार आव्हाड यांनी सध्याची वाढती महागाई, मराठा आरक्षण, इंडिया आघाडी आदी विविध मुद्द्यांवर राज्यातील व केंद्रातील सरकारवर सडकून टीका केली.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे ही उभ्या महाराष्ट्राची मागणी आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याचे सांगितले जात आहे. परंतु दिल्ली सरकारला राज्याचे अधिकार मिळावे हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केंद्राला न पटल्याने तो लोकसभेत नेऊन बदलण्यात आल्याचा आरोप करून मराठा आरक्षणाचा विषयही लोकसभेत घेऊन जा आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्या, अशी मागणी आव्हाड यांनी केली. जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तर कालिदास देशमुख व शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांचेही यावेळी भाषण झाले.

इंडिया हे नाव बदलण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार असल्याचे सांगून विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला भारत नाव दिले तर तेही बदलणार का? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांच्या निवडणुका तीन टप्प्यात होतात. लोकसभा निवडणुका तीन टप्प्यात होतात. या निवडणुका एकच वेळी घ्यायच्या झाल्यास तीन महिने सर्व कारभार बंद ठेवून निवडणुका घ्याव्या लागतील असे सांगून हा निर्णय चुकीचा असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.