डिजिटल वर्ग सुरू केल्याने पालिका शाळांमधील विद्यार्थी वाढले

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्याकरिता आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

शाळेतील वर्गात रंगरंगोटी, विविध संकल्पनेतून साकारण्यात आलेली भित्तीचित्रे, नवीन अभ्यासक्रमांची पुस्तके, संगणक कक्ष या सर्वांच्या माध्यमातून शाळेची व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा ध्यास महानगरपालिकेने घेतला आहे. पालिकेच्या साहित्य पुरवठ्यामुळे विद्यार्थी पट संख्येत वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी महापालिका सदैव प्रयत्नशील असून शैक्षणिक दर्जा आणखी उंचविण्यासाठी आयुक्त ढोले आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने दिवाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये डिजिटल स्वरूपात वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती, चित्रफित किंवा फोटोच्या स्वरूपात शिकवण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर डिजिटल वर्ग हे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी या भाषेत सुरू करण्यात आले आहेत. या डिजिटल वर्गांमुळे पालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

डिजिटल वर्ग सुरू करण्यापूर्वी मिरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ७,२४८ इतकी होती. दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांची पटसंख्या ८०२५ इतकी झाली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या एकूण ७७७ ने वाढलेली आहे.

शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश करावेत, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.