ठाण्यातील सखल भागांची सुभेदारांनी केली पाहणी
ठाणे : दिवसभर पाऊस पडल्यास ठाण्यातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होते. यंदा प्रथमच भारतीय सैन्याच्या सुभेदारांनी ठाण्यात येऊन सखल भागांची पाहणी केली. शहरात अशी स्थिती निर्माण झालीच तर टीडीआरएफच्या सोबतीला यावेळी भारतीय सैन्यही मदतीला असणार आहे.
ठाण्यात दरवर्षी पूरजन्य स्थिती निर्माण होत असते. त्यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या मदत कार्यात आघाडीवर असतात. एनडीआरएफच्या जोडीला आता ठाणे महापालिकेची टीडीआरएफ ही रेस्क्यू टीमही सज्ज झाली आहे. आतापर्यंत टीडीआरएफने ठाण्यासह रायगड आणि अन्य जिल्ह्यातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदा ठाण्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्यास या पथकांबरोबर भारतीय सैन्यही असणार आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी ठाण्यात हजेरी लावत सखल भागांची पाहणी केली. कलिना मिलिटरी कॅम्पचे नायब सुभेदार-सजीव एस. यांनी पालिका मुख्यालयातील ‘प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. प्रादेशिक आपत्ती कक्षाशी समन्वय साधून, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागांची व मोठ्या प्रमाणात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी नायब सुभेदार सजीव एस. यांच्यासोबत तीन सुभेदार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारीही उपस्थित होते.
दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबणाऱ्या ठाण्यातील श्रीरंग सोसायटी, साकेत लगतचा परिसर, वृंदावन सोसायटी, खर्डीगाव, देसाई नाका येथील रिव्हरवूड पार्क आदी भागांची आर्मीने पहाणी केली.