हताश वृद्धाची हरवलेली दृष्टी परत मिळाली

ठाणे स्थानकात एकटेच जगत होते अंधारमय जीवन ठाणे सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी
ठाणे: वाढलेले वयोमान आणि हलाखीची परिस्थिती अशातच डोळ्यांनी धूसर दिसत असल्याने जीवनात अंधार पसरलेला असताना, सिव्हिल रुग्णालयाने एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यांमध्ये आनंदाची ज्योती आणली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात हताश होऊन बसलेल्या अजीज शेख यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर, त्याची हरवलेली दृष्टी पुन्हा मिळाली आहे.
भिवंडी परिसरात राहणारे अजीज शेख (७९) हे पूर्वी लहान-सहान नोकरी करून स्वतःचा चरितार्थ चालवत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अंधुक दिसत असल्याने नोकरी करणे अवघड होऊन बसले. कौटुंबिक परिस्थिती देखील बेताची असल्याने वृद्धापकाळात देखील कामाची आवश्यकता होती. परंतु डोळ्यांना व्यवस्थित दिसत नसल्यामुळे अजीज यांच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली होती. ठाणे स्थानक परिसरात काही दिवसांपासून एकटेच राहत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र तिवारी यांना अजीज दिसले. त्यांची विचारपूस केली असता, डोळ्यांनी दिसत नसल्याने अजीज यांनी सांगितले.
ठाणे सिव्हील रुग्णालयात डोळ्यांच्या चांगल्या शस्त्रक्रिया होतात. त्यामुळे राघवेंद्र यांनी अजीज यांना सिव्हिलमध्ये उपचारासाठी घेऊन आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजीज यांच्या दोन्ही डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यापूर्वी अजीज यांची शारीरिक तपासणी करून घेतली. त्यानंतर रुग्णालयातच उपचार सुरू ठेवून आठ दिवसांच्या अंतराने दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. ही शस्त्रक्रिया काही मिनिटांची असली तरी रुग्णालयासाठी आव्हान होत. परंतु शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे आमच्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणाले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संगीता माकोडे, नेत्रतज्ज्ञ चिकीत्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
माझ्या दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे खूप हताश झालो होतो. डोळ्यांवर इलाज करण्यासाठी मुंबई-ठाण्यातील काही रुग्णालयात दाखवले, मात्र सर्वांनी नकार दिला. ठाणे स्थानक परिसरात एकटाच कसातरी राहत होतो. दरम्यान समाजसेवक राघवेंद्र तिवारी यांनी मला सिव्हिल रुग्णालयात आणले आणि या ठिकाणी माझ्या दोन्ही डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आज सिव्हिल रुग्णालयामुळे मला व्यवस्थित दिसू लागले आहे. त्यामुळे मी माझी रोजीरोटी मिळवू शकतो, अशा भावना अजीज शेख यांनी व्यक्त केल्या.