नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या एकूण सहा मतदार संघांपैकी दोन मतदारसंघ नवी मुंबईत मोडत असून नवी मुंबईतून राजन विचारे यांना सर्वाधिक मतदान झाले आहे.
म्हस्के यांना ऐरोलीमधून ९७३५ तर बेलापूरमधून १२,३१२ मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे महायुतीत नवी मुंबईतील चार जिल्हाध्यक्ष, दोन आमदार आणि १०० च्या वर माजी नगरसेवक असून देखील अवघे २२ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.
ठाणे लोकसभा निवडणूक ही भाजपतर्फे संजीव नाईक यांनी लढवावी असा सूर भाजपा कार्यकर्त्यांचा होता. त्यामुळे नरेश म्हस्के यांची शिवसेनातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र राजीनामे देणारे हे फक्त नाईक समर्थक असून मूळ भाजप पदाधिकारी नव्हते, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी जाहीर केले. त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक समर्थकांची समजूत काढल्यानंतर म्हस्के यांच्या प्रचाराला सुरुवात केली.
म्हस्के यांच्या प्रचारात गणेश नाईक, मंदा म्हात्रे असे दोन आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले, शिवसेना नेते विजय नाहटा, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, आरपीआय अध्यक्ष महेश खरे आणि १०० च्या वर माजी नगरसेवक अशी फौज उतरली होती. त्यामुळे म्हस्के यांना नवी मुंबईतून किमान चार लाख मते मिळतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नसून म्हस्के यांना नवी मुंबईतून दोन लाख ११ हजार मते मिळाली आहेत. तर राजन विचारे यांना एक लाख ९० हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीला नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघातून मिळालेली मते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही धोक्याची घंटा आहे.