येऊरमधील बॉम्बे डक हॉटेलच्या अतिक्रमणावर अखेर हातोडा

ठाणे : येऊर येथील अनधिकृत हॉटेल, लॉन्सवरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि संस्थांनी आवाज उठवल्यानंतर येथील स्थानिकांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. अखेर उशीराने जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येऊर येथील बॉम्बे डक या हॉटेलमधील वाढीव अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली.

अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा ठाणे शहरात मागील काही महिन्यापासून गाजत आहे. त्यानंतर मागील काही दिवसापासून येऊर येथील वाढत्या अतिक्रमणांमुळे देखील येऊरचा बळी जात असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि विविध संस्थांनी उपस्थित केला होता. गुरुवारी येथील स्थानिकांनी देखील या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी येथील बॉम्बे डक या हॉटेलमधील वाढीव अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हॉटेल धारकाला दोन महिन्यांपूर्वी वाढीव अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्याने वाढीव बांधकाम न काढल्याने अखेर ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

अनधिकृत हॉटेल आणि इतर आस्थापनांची यादीच आता वर्तक नगर प्रभाग समितीने तयार केली असून त्यानुसार आता त्या सर्वांवर टप्याटप्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अडवले

अनेक ढाबे आणि हॉटेलवाल्यांनी नाले आणि पाण्याच्या ओहोळांवर बांधकामे केली आहेत. भविष्यात या स्त्रोतांना मोकळे करणे अशक्य होणार आहे. अशा हॉटेल-आस्थापनांवरही तोडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. केवळ एका हॉटेलवर कारवाई न करता सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.