जादा प्रवासी बसवण्याची ५९३ रिक्षाचालकांची सवय सुटेना

ठाणे : ठाण्यात रिक्षात ‘फ्रंट सिटींग’ प्रवासी घेण्याची संख्या घटली असली तरी तीनपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याची बहुतांशी रिक्षाचालकांची सवय सुटलेली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दंडाचा बडगा उगारला आहे.

१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत तीनशिवाय अतिरिक्त प्रवासी घेणा-या १२२ चालकांविरुद्ध २४ हजार ६०० रुपये दंड आकारणी केली होती. परंतु, हा नियम १ जानेवारी २२ ते २३ मे २२ पर्यंत न बाळगणा-या ५९३ चालकांवर दंडात्मक कारवाई करुन तब्बल १ लाख २६, २०० रुपये दंड वसूल केला आहे. प्रवाशाला पुढील आसनावर बसवून वाहन चालवणा-या चालकाला धोका होऊ शकतो, असे माहिती असूनदेखील असा गुन्हा करणा-या ५८,१०३ फ्रंट सिटींग केसेस् १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २१ करण्यात आल्या आणि तब्बल १ कोटी २५ लाख ३३,३०० रुपये दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला होता. १ जानेवारी २२ ते २३ मे २२ पर्यंत याच गुन्हयात गुंतलेल्या चालकांवर लक्ष ठेवून, गेल्या वर्षाच्या तुलनेत गेल्या ४ महिने २२ दिवसांत २३ हजार ११८ केसेस् करुन, दोन कोटी २३ लाख २ हजार रुपये लक्षणीय दंडात्मक कारवाई केली.

कॅब आणि टॅक्सी चालकाने पांढरा गणवेश न घातल्यास त्यांच्यावरही १ जानेवारी २२ ते २३ मेपर्यंत ८ हजार ९४६ केसेस् करण्यात आल्या. अशा चालकांकडून ६१ लाख ९० हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला, अशी माहिती उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.