कोरोनाची वाढ जगात; काळजी नाही ठाण्यात !

* रोज २००० चाचण्या; ३५०० रुग्णशय्या
* कोविडच्या विरोधात लढण्यासाठी ठामपा सज्ज

ठाणे: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून ठाणे महापालिकाही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे. रोज दोन हजार चाचण्या करण्याचे निर्देश ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. शहरात सुमारे साडेतीन हजार रुग्णांसाठी रुग्णशय्या उपलब्ध असून पुरेसा प्राणवायू आणि औषधे उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची आज तातडीने बैठक घेत शहरात दैनंदिन कोव्हीड चाचण्या आणि लसीकरणाचा आढावा घेतला. चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ-७  या नव्या व्हेरीएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असून भारतातही गुजरात व ओरिसा राज्यातही चार रुग्ण आढळून आले आहेत. कोविडच्या मागील लाटेबाबतचा आढावा घेऊन यापुढील काळात आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोव्हीडचा धोका अजून टळलेला नाही, असा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्याची गरज असल्याचेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

महापालिका कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचण्यांची संख्या कमी असून दिवसाला दोन हजारपर्यंत चाचण्या करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोविड चाचण्यांच्या माध्यमातून कोविडचा किती प्रसार झालेला आहे, ते वस्तुनिष्ठपणे कळू शकते, त्या माध्यमातून कोविडचा प्रसार वाढत आहे किंवा कसे हे योग्यवेळी कळेल. या दृष्टीने ही बाब महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे स्थानके या ठिकाणीही कोव्हीड चाचण्या सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या.

नमुना घेतल्यापासून २४ तासाच्या आत अहवाल येणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये कोणताही विलंब चालणार नाही. यासाठी तीन पाळ्यांमध्ये २४ तास प्रयोगशाळा सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे. कोव्हिड लसीकरणावर भर देत असतानाच रुग्णालयातील औषधांची उपलब्धतता प्राणवायूच्या पुरेशा टाक्या, रुग्णशय्या आदींची तयारी ठेवावी. रुग्णालयातील मुलभूत सेवा-सुविधांचे ऑडिट करावे,
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील मुलभूत सेवासुविधांची पाहणी करण्यात यावी. यामध्ये ऑक्सिजन, फायर, स्ट्रक्चरल, विद्युतीकरण व पाणीपुरवठा आदी सेवासुविधांचे ऑडिट करुन आवश्यकता असल्यास त्याचे काम करण्यात यावे. जेणेकरुन आगामी काळात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने लवकरच कोव्हीड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील, त्यानुसार तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या. या बैठकीस उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शर्मा, डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

कोव्हीडची जागतिक स्थिती पाहता आपण अत्यंत सतर्क राहण्याची गरज असून कोव्ह‍ीडचा धोका अद्याप टळलेला नाही हे लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री. बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

पार्किंग प्लाझा, व्होल्टास, कौसा रुग्णालय, भाईंदर पाडा आणि कळवा रुग्णालय येथे अडीच हजार रुग्णांची तर खासगी रुग्णालयात एक हजार रुग्णांची व्यवस्था होऊ शकते.