रेल्वेने प्रवाशांकडून मागवल्या सूचना
बदलापूर : ऐन गर्दीच्या वेळेस पुन्हा वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा घाट मध्य रेल्वेने घातला आहे. त्या संदर्भातील सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकडून मागवल्या असून तशा सूचना मागवण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकात फलक लावण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा संतापाचे वातावरण पसरले आहे.
अवघ्या वीस दिवसांपूर्वी एसी लोकल बंद करण्यात आली होती. तेव्हा प्रवाशांनी केलेल्या विरोधाची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली होती. मात्र वीस दिवसानंतर पुन्हा एकदा मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे प्रवासी अधिकच संतप्त झाले आहेत. आमच्या नेहमीच्या गाड्या सुरू ठेवून एसी लोकल सुरू करा त्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही, मात्र एसी लोकल सुरू करताना सध्या असलेल्या गाड्या एसी करू नका एवढीच प्रवाशांनी मागणी केली आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासन अशा प्रकारे सूचना आणि हरकती मागून सर्वसामान्य प्रवाशांना नाहक मानसिक त्रास देत आहे. आधीच बदलापूर आणि उपनगरात येणाऱ्या गाड्यांची संख्या संध्याकाळी आणि सकाळी गर्दीच्या वेळेस कमी असताना आहेत त्या गाड्या एसी करून आणखीन प्रवाशांचे अडचण रेल्वे प्रशासन का निर्माण करत आहे ? असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.
रेल्वेने मागवलेल्या सूचना आणि हरकतींना कडाडून विरोध करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि रेल्वे प्रवासी एकजूट होत असून रेल्वेच्या या सूचना आणि हरकतींच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.