गटई स्टॉलधारकांनी थकवले ठामपाचे लाखो रुपयांचे भाडे

स्टॉल परस्पर दिले भाड्याने

ठाणे : गटई स्टॉलधारकांनी स्टॉलच्या भाड्यापोटी ठाणे महापालिकेचे जवळपास ११ लाखांचे भाडे थकवले असल्याचा प्रकार उघड झाला आहे. काही स्टॉलधारकांनी स्टॉल परस्पर भाड्याने दिले असल्याचेही उघडकीस आले आहे. तर काहींचे स्टॉलही जागेवर आढळून आले नाहीत. या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. प्रतिसाद न दिल्यास स्टॉल जप्त करण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या वतीने २००८ साली या स्टॉलचे वाटप करण्यात आले होते. नियमाप्रमाणे या स्टॉलवर स्वतः लाभार्थ्यांनी हजर राहणे आवश्यक आहे. तर देण्यात आलेला स्टॉल परस्पर भाड्यानेही देता येत नसल्याचा नियम आहे. मात्र अनेक स्टॉलधारकांनी या नियमालाच हरताळ फासण्याचे काम केले आहे. एकदा स्टॉलचे वाटप झाल्यानंतर त्याची साधी चौकशी देखील महापालिकेच्या वतीने करण्यात येत नाही. मात्र आता याबाबत ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने ठाणे शहरात नुकतेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन या सर्व स्टॉलचे सर्व्हेक्षण केल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहे. यामध्ये स्टॉल परस्पर भाड्याने देणे, स्टॉल जागेवर नसणे, स्टॉल बंद असणे, स्टॉलवर इतर व्यवसाय करणे असे प्रकार उघड झाले आहेत. लाभार्थ्यांकडून अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने प्रशासनाने देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे अनेक स्टॉल धारकांनी ठाणे महापालिकेचे जवळपास ११ लाखांचे भाडे देखील थकवले असून काहींची थकबाकी तर ४० हजारांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व स्टॉल धारकांची यादी तयार करण्यात आली असून या सर्वाना आता ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्व नोटिसा त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या असून सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर काही प्रतिसाद आला नाही तर जप्तीची कारवाई देखील केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.