भलताच झाला ‘गेम’; धर्मांतरासाठी मुंब्र्यातून नेम!

मास्टर माईंडच्या शोधात गाझियाबाद पोलिसांची दोन पथके मुंबई-ठाण्यात

ठाणे : ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांचे धर्मांतरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार गाझियाबाद शहरात उघड झाला आहे. या घटनेच्या तपासात धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरापर्यंत पोहचले असल्याचे उघड झाले आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद शहरात अल्पवयीन हिंदू मुलांचे धर्मांतरण ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून होत असल्याचे उघड झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. गेम खेळणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांना धर्मांतरण करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एका मौलवीस अटक केली आहे.

या मौलवीने गाझियाबाद पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून धर्मांतरण करण्याच्या कटाचा मास्टर माईंड शाहनवाज उर्फ बद्दो नामक व्यक्ती असून तो ठाण्यातल्या मुंब्रा परिसरातील राहणारा आहे. शाहनवाज उर्फ बद्दो हा फोर्ट नाइट गेम आणि डिस्कॉर्ड या दोन ॲपवर हिंदू नावाने फेक आयडी बनवून अल्पवयीन तरुणांच्या गेमिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचा. त्यानंतर तो गेम खेळण्यासाठी अल्पवयीन मुलांना विविध पद्धती शिकवायचा. त्यात तो मुलांना धार्मिक प्रार्थना म्हणायला लावायचा आणि जाकीर नाईक यांचे देखील व्हिडीओ दाखवायचा. तुम्ही प्रार्थना म्हटली तर गेम सहज जिंकू शकतात असे तो मुलांना सांगायचा. त्याने अशाच प्रकारे आतापर्यंत मुंब्रा शहर व इतर ठिकाणच्या चारशेहून अधिक जणांचे धर्मांतर केले असल्याची देखील माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.

या खळबळजनक घटनेनंतर गाझियाबाद पोलिसांनी शाहनवाज उर्फ बद्दो याचा कसून शोध सुरू केला असून गाझियाबाद पोलिसांची दोन पथके गेल्या दोन दिवसांपासून ठाणे आणि मुंबई शहरात तळ ठोकून आहेत. या पथकांनी आतापर्यंत मुंब्रा, नवी मुंबई, मुंबई परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने दहा ठिकाणी छापेमारी केली आहे. मात्र, शाहनवाज उर्फ बद्दो हा अद्याप हाती लागलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.