नवी मुंबई: नवी मुंबई आरटीओने शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, महाविद्यालयांतील दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीबाबत १९४ डी अंतर्गत नोटीस बजावली होती. शहरातील १९२ कंपन्यांना ही नोटीस बजावली असून आरटीओने आता विना हेल्मेट कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
दोन दिवसात ६० जणांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी एक हजार रुपये अशी दंडात्मक वसुली तसेच काही जणांचा वाहन परवाना निलंबित करण्यात आला आहे. अशी माहिती आरटीओ विभागाने दिली आहे. शहरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे, त्याच धर्तीवर वाहने देखील वाढत आहेत. मात्र या वाढत्या वाहनांबरोबर नवी मुंबईत वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांच्या संख्येत वाढ होत असून त्यातील बहुतांश अपघात हे दुचाकीचे असून यात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. दुचाकी अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. हेल्मेट सक्तीबाबत नवी मुंबई आरटीओ विभागाने खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, महाविद्यालय यांना नोटीस बजावून जनजागृती केली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपासून या खासगी शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बगडा उगारला असून दोन दिवसांत ६०जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.