प्रसंगावधानामुळे कुटूंब बचावले
शहापूर : देव तारी, त्याला कोण मारी असे म्हणतात त्याचा प्रत्यय आला तो शहापुरातील द्वारकानगरी परिसरात. पेशाने शिक्षक आणि शिल्पकलेत माहीर असलेले मनिष व्यापारी यांचे संपूर्ण कुटूंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडता पडता वाचले. शनिवारी 13 जुलै रोजी पहाटे 3 वाजता त्यांच्या स्वयंपाक घरातील फ्रीजला आग लागल्याने संपूर्ण स्वयंपाक घर जळून खाक झाले.
स्वयंपाक घर जळाल्याने श्वास कोंडू लागला, त्यामुळे मनिष व्यापारी यांना सुदैवाने जाग आली आणि महत्प्रयासाने अंधारातून पूर्ण कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांना यश आले. आगीचे कारण रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरमधलं शॉर्ट सर्किट हे असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
शहापुरातील द्वारकानगरी परिसरात वर्षा नावाचा नावाचा बंगला आहे. यामध्ये मनिष व्यापारी यांच्यासह वडिल प्रभाकर व्यापारी, आई वासंती व्यापारी, पत्नी रेश्मा व्यापारी तसेच दोन मुलगे आर्यन व तन्मय राहतात. आता त्यांचे संपूर्ण घर काजळीने काळे झाले आहे. तथापि माहुली निसर्ग सेवा न्यासचे सदस्य, मित्रमंडळी, नातेवाईक यांनी त्वरित आपत्कालीन मदत केली. ही मदत आभाराच्या शब्दांच्या पलीकडची आहे, असे मनिष यांनी दैनिक ठाणेवैभवशी बोलतांना सांगितले. सध्या घर आणि कुटुंब सावरण्याचा आम्ही प्रयत्न करत असून दैव बलवत्तर म्हणून आम्ही सर्व सुरक्षित राहिल्याचे सांगून या अपमृत्युच्या दाढेतून बाहेर निघणे म्हणजे आमच्या कुटुंबावर ही ईश्वरी कृपाच झाल्याचे व्यापारी कुटुंबीयांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
रात्री झोपतांना बेसावधपणा नको
रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरमधील शॉर्ट सर्किटमुळे मनीष व्यापारी यांच्या घरात आग लागली असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान रात्री झोपतांना घरातील फ्रीजचा दरवाजा पुर्ण बंद आहे का ते काळजीपूर्वक पहावे,खिडक्यांना जाळी बसवावी जेणेकरून घरातील हवा खेळती राहील याकडे कटाक्षाने पहावे, फ्रीजच्या आवाजावरून तो ठीक आहे की नाही हे कळते. त्यामुळे कॉम्प्रेसरचा एकसमान आवाज ऐकू येत असेल तर याचा अर्थ त्यात काही तरी बिघाड आहे, कॉम्प्रेसरमधून मोठा आवाज येत असेल किंवा अजिबात आवाज येत नसेल तर त्यात काही तरी बिघाड झाला असं समजावे,फ्रीज दहा वर्षं जुना असेल तर त्याची नियमित तपासणी करावी, फ्रीज भिंतीला चिकटून न ठेवता फ्रीज आणि भिंत यांच्यात पुरेशी जागा असावी. फ्रीजमधल्या वस्तू नीट थंड होत नसतील तर तातडीने टेक्निशियनला बोलवावे,फ्रीज मागच्या बाजूने जास्त गरम होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते. त्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.