मीरारोड : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या उघड्या टाकीत मसिया ही पाच वर्षाची मुलगी पडली. सुदैवाने मुलीचा जीव वाचला. मुलगी टाकीत पडताच तिच्या छोट्या बहिणीने वडिलांना जोर जोरात आवाज देऊन बोलावले. त्यावेळी तिच्या वडिलांनी धावत येऊन त्या संडासच्या टाकीत उडी मारून मुलीचा जीव वाचवला आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मीरा-भाईंदर शहरात सार्वजनिक शौचालये ही ठेकेदाराला देखभाल करण्यासाठी देण्यात आली आहेत. यासाठी पालिका वर्षाला करोडो रुपये खर्च करत आहे. करोडो रुपये खर्च करत असताना शौचालयाची देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्थित साफ सफाई केली जात नाही, त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते.
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील वेलंकनी येथील शौचालयाची अवस्थाही अशीच आहे. या शौचालयाची एक टाकी उघडी असल्याने त्या टाकीत पाच वर्ष वयाची मुलगी पडली. सुदैवाने त्या मुलीचा जीव वाचवण्यास तिच्या वडिलांना यश आले. मेरीटन फर्नाडिस, फुलमेना हे पती-पत्नी व पाच वर्षाची मसीया व तीन वर्षाची नुरल या दोन लहान मुली हा परिवार गोवा येथून फिरण्यासाठी मुबंईला आला होता. ते भाईंदरमधील वेलंकनीच्या दर्शनासाठी शनिवारी आले होते.
शनिवारी दुपारी १ च्या सुमारास सार्वजनिक शौचालयात गेले असता ती दोघे महिला व पुरुष अशा वेगवेगळ्या शौचालयात गेले. थोडया वेळातच एक मुलगी शौचालयाच्या टाकीत पडली. त्याचवेळी तिच्या छोट्या बहिणीने ओरडून तिच्या वडिलांना बोलावले. त्यांनी धावत येऊन टाकीत उडी मारून मुलीला वर उचलून धरले. तोपर्यंत आजूबाजूचे नागरिक तेथे जमा झाले व त्यांनी त्या दोघांना बाहेर काढले. तिच्या वडिलांनी ताबडतोब मुलीला बाहेर काढल्यामुळे मुलीचा जीव वाचला. तेथील ग्रामस्थांनी त्यांना अंघोळीसाठी पाणी व कपडे दिले. त्यानंतर मुलीला दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. शौचालय ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. यापूर्वीही काशीमीरा परिसरात दोन घटना घडून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिकेने ठेकेदारावर कारवाई करून करोडो रुपये खर्च होत आहे त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे असे नागरिक सांगत आहेत.