आनंद कांबळे/ठाणे
ठाणे लोकसभा मतदार संघातील २५ लाख बहुभाषिक मतदारांच्या हातात निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. या मतदार संघातील ओवळा-माजिवडा मतदार संघातील मते निर्णायक ठरणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपांखाडी, ठाणे, ऐरोली आणि बेलापूर हे सहा विधानसभा मतदार संघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतात. १३ लाख ३९ हजार पुरुष आणि ११ लाख ५०,७१६ असे एकूण २४ लाख ९०,५१३ मतदारांचा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला हा मतदार संघ आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदार ओवळा माजिवडा मतदारसंघात पाच लाख पाच हजार ४५० इतके मतदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात घोडबंदर रोड, मीरा-भाईंदर ठाण्यातील वर्तकनगर, लोकमान्य नगर या भागाचा समावेश आहे. घोडबंदर रोड, मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर या भागातील नागरिकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या परिसरात देशाच्या कानकोपऱ्यातून मुंबई येथे नोकरीला असलेले बहुभाषिक नागरिक स्थायिक झाले आहेत तर ठाणे, कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघांत मराठी आणि भूमिपुत्रांची वस्ती आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघात दरवर्षी मतदार संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे या भागातील मते निर्णायक ठरण्याची श्यक्यता आहे. नव मतदार देखिल याच मतदार संघात वाढले आहेत. या मतदार संघातील मतांची टक्केवारी ज्या पक्षाचे कार्यकर्ते वाढवतील त्यांना या मतदारसंघात जास्त फायदा होण्याचा अंदाज आहे.
निवडणूक विभागाने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांच्या गृह निर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारली आहेत, त्यामुळे सुशिक्षित मतदारांना मतदान केंद्रात घेऊन जाणारा उमेदवार यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे.
या मतदारसंघात भूमिपुत्र आणि झोपडपट्टी भागात देखिल मोठ्या प्रमाणावर मतदार राहतात. मतदानाची टक्केवारी या भागातूनच वाढत असते, त्यामुळे उमेदवारांनी या परिसरातील त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्यशील केले आहे. मतदाराला मतदान केंद्रात घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापराण्यास आत्तापासूनच उमेदवारानी सुरु केल्या आहेत. बहुभाषिक मतदारांना आकर्षित करणारा उमेदवार या मतदारसंघात बाजी मारेल असे जाणकारांचे मत आहे.