जिल्ह्यातील ७९ उमेदवारांचे भवितव्य आज होणार मतपेटीत बंद

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघातील सुमारे 66 लाख 78,476 मतदार उद्या 20 मे रोजी मतदानाचा हक्क बजावून ७९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहे. तिन्ही मतदारसंघांत एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
पाचव्या टप्प्यात ठाणे, कल्याण आणि भिंवडी लोकसभा मतदारसंघांत तब्बल ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी ठाणे आणि कल्याण मतदारसंघांत शिवसेनेच्या दोन गटांत सामना होणार आहे. तर भिवंडी मतदार संघात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अपक्ष असा सामना पहायला मिळत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यात थेट लढत आहे. ही लढाई अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. हे दोन्ही उमेदवार मुळचे शिवसैनिक असून एकेकाळी एकत्र काम केलेले आहे. मात्र शिवसेनेत दोन गट बनल्यानंतर हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत.
मतदारसंघात एकूण २५ लाख ७,३७२ मतदार आहेत. ५१ टक्के मराठी आणि उर्वरित इतर भाषिक मतदार येथे आहेत. सत्तेचा धनुष्यबाण विरुद्ध निष्ठेची मशाल असे या निवडणुकीला रंग देण्यात आला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक २८ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर-राणे यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाकडे असलेल्या मोजक्या पदाधिकार्‍यांची ताकदही कमकूवत करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे झंझावती प्रचार तर दुसरीकडे प्रचारात कार्यकर्त्यांची वानवा अशी परिस्थिती येथे पहायला मिळाली. या निवडणुकीत आतापर्यंत मिळालेल्या मतांचा रेकॉर्ड मोडणार असा दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने महिला कार्ड खेळून महिला मतदारांच्या सहानुभूतीसह मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळया मामा म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत आहे. या लढाईत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी देखील शड्डू ठोकला आहे. गेल्या दहा दिवसांच्या प्रचारात कपिल पाटील यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. तर बाळया मामासाठी शरद पवार यांनी तीन सभा घेतल्या. शेवटच्या दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सभा घेतली.
ठाणे, कल्याण आणि भिवंडीतील७९ उमेदवारांमध्ये सहा उमेदवार हे प्रमुख पक्षांचे आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार आहे. याशिवय ४५ उमेदवार हे अपक्ष असून उर्वरित सपा, एमआयएम, भीम सेना इत्यादी छोट्या पक्षाचे आहेत. यामध्ये १३ महिला उमेदवारही आहेत.
निवडणुकांच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकाही छोट्या अथवा अपक्ष उमेदाराला अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र प्रत्येक उमेदवाराने ५०० ते तीन हजार मते घेतली आहेत. त्यामुळे या अपक्षांच्या खात्यात जाणार्‍या मतांचा फटका कोणाला बसणार हे पहावे लागणार.
उमेदवार निवडीमुळे तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सहयोगी पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगले. त्यात ठाण्यात भाजपला ही जागा न मिळाल्यामुळे संघ विचारी मतदारांमध्ये अजूनही नाराजी आहे. त्याचा फटका नोटांच्या स्वरुपात पडण्याची शक्यता आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक २० हजार ४२६ नोटा मतांचा पाऊस ठाणे लोकसभा मतदारसंघात पडला होता. कल्याण लोकसभेत १३ हजार १२ नोटा मतदान झाले होते. तर भिवंडीत १६ हजार ३९७ नोटा मतदान झाले होते.
तिन्ही लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. हे तिन्ही खासदार हॅट्रीकच्या उंबरठयावर असून मतदार त्यांना तिसर्‍यांदा संसदेत जाण्याची संधी देणार का हे पहावे लागेल.
शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे पक्षाचे पारंपारिक चिन्ह धनुष्यबाण आहे. तर ठाकरे गटाकडे मशाल आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे तुतारी वाजवणार्‍या माणसाचे चिन्ह आले आहे. अजित पवार गटाकडे पारंपारिक घड्याळ आहे. पण अजित पवार गट निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत गफलत होण्याची शक्यता कमी आहे. पण शिवसेनेचा मतदार गोंधळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय पक्ष ‘आपल्या’ मतांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत असताना शासकीय यंत्रणाही एकूण मतांचा टक्का वाढवण्यासाठी झटत असल्याचे दिसते. गृहमतदान, टपाली मतदान यासारख्या अभिनव संकल्पना राबवल्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातूनही मतदानाविषयी जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती.

ठाणे लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 25,08,072
पुरुष मतदार – 13,48,163
महिला मतदार – 11,59,002
तृतीयपंथी मतदार – 207
सेवा मतदार – 700
ठाणे लोकसभा मतदारसंघात २४४८ मतदान केंद्रे असून ११,७५० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
……………..
कल्याण लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 20,82,800
पुरुष मतदार – 11,17,414
महिला मतदार – 964021
तृतीयपंथी मतदार – 786
सेवा मतदार – 579
कल्याण लोकसभा मतदारसंघात १९५५ मतदान केंद्रे असून ९,३८४ अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
…………………………..
भिवंडी लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 20,87,604
पुरुष मतदार – 11,29,714
महिला मतदार – 9,57,191
तृतीयपंथी मतदार – 339,
सेवा मतदार – 360
भिवंडी लोकसभा मतदारसंघात २१८९ मतदान केंद्रे असून १०,५०७ अधिकारी-कर्मचारी देण्यात आले आहेत.