१० एमएलडी पाण्यासाठी उभारावे लागणार प्रक्रिया केंद्र
ठाणे: मुंबई महापालिकेच्या कोट्यातून प्रक्रिया न केलेले १० एमएलडी पाणी मिळणार आहे. हे पाणी पिण्यास योग्य करण्यासाठी ठाणे महापालिकेला प्रक्रिया केंद उभारावे लागणार आहे. हा मार्ग खर्चिक असून परवडणारही नाही. त्यामुळे पाणी मंजूर होऊनही ठाणे महापालिकेचा खोळंबा झाला आहे.
ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महापालिकेकडून ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा मंजूर झाला आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुंबई महापालिकेलाही यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी केली होती.त्यानुसार मुंबई महापालिकेने ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे.
हे पाणी प्रक्रिया न केलेले असल्याने या पाण्याचा वापर करणे शक्य नसल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय प्रक्रिया करण्याचा खर्च देखील परवडणारा नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तानसा धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी मिळत असल्याने अशा प्रकारची अडचण आली नव्हती. मात्र हे पाणी वैतरणा धरणातून मिळणार असल्याने प्रक्रिया न केलेले पाणी मिळणार असून पावसाळ्यात तर अधिक दूषित पाणी येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.