कांदळवनाची हद्द निश्चित होणार; शेतकऱ्यांना मोबदला मिळणार

आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्ष्यवेधीनंतर शासनाचा निर्णय

ठाणे: बीज प्रसारामुळे कांदळवनाची वाढ शेत जमिनीसह शासकीय जमिनीवरही झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता कांदळवनाची नवीन हद्द निश्चित करण्यात येणार असून बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याबाबत वनविभागाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. याचा फायदा ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ठाणे आणि मीरा-भाईंदर तसेच राज्यातील खाडीकिनारा लाभलेल्या इतर ठिकाणी पाऊस-पाण्यामुळे कांदळवनाच्या बिया शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर जाऊन त्या ठिकाणी कांदळवने निर्माण होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. वनखात्याने सन २००५ साली सर्वेक्षण करून कांदळवनांची सिमारेषा निश्चित केली होती. परंतु ज्या सीमारेषा निश्चित केल्या होत्या त्या सीमारेषा ओलांडून गेल्या १८ वर्षांमध्ये शेतजमिनींवर आणि खासगी जमिनींवर मोठ्या प्रमाणात कांदळवने निर्माण झालेली आहेत.

जमिन कांदळवनाने बाधीत झाली असल्याने त्या ठिकाणी शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेती करता येत नाही तर मिठागरे असणाऱ्या भूमिपुत्रांना मिठागरांची निर्मितीसुध्दा करता येत नाही. त्याचबरोबर जमिन हस्तांतरीत होत असताना खाजगी जमिन मालकांना जमिनीवरील कांदळवनामुळे केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणारा मोबदला इतर जमिन मालकांप्रमाणे मिळत नव्हता.

शेतकरी आणि भूमिपुत्रांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी सुचना मांडली होती. त्याआधारे २७ जुलै, २०२३ रोजी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी त्यांच्या विधानभवनाच्या दालनात बैठक घेतली असता, वनखात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी ही वस्तुस्थिती असल्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच भूमिअभिलेख कार्यालयाद्वारे शासकिय सर्वेक्षण करून कांदळवनांची नवीन हद्द निश्चित करणार असल्यामुळे भविष्यामध्ये खाजगी व शासकिय जमिनीवर या कांदळवनांची वाढ होणार नाही.

सन २००५ नंतर ज्या खासगी जमिनींवर कांदळवने निर्माण झालेली आहेत. त्या बाधीत शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना आर्थिक मोबदला अथवा टीडीआरच्या स्वरूपात मिळणारा मोबदला हा इतर जमिन मालकांप्रमाणेच मिळण्यासंदर्भात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांबरोबर बैठक करण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिल्यामुळे भविष्यामध्ये स्थानिक शेतकरी व भुमिपुत्रांना त्यांचा त्या प्रमाणात फायदा होणार आहे.

या बैठकीला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रताप सरनाईक, वनखात्याचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, श्री. वाय.एल.पी. राव (प्र.मु.वन), महिप गुप्ता (प्र.मु.व.सं.-वन्यजीव), क्लेमेंट बेन (अ.प्र.मुं.का-मुंबई), आदर्श रेड्डी (वि.व.अ.-कांदळवन) व इतर अधिकारी उपस्थित होते.