नव्यांचे प्रवेश थाटात; जुने सैनिक कोमात!

तिकिटासाठी वाढली चिंता

ठाणे: कळवा भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आमचे काय होणार असा प्रश्न त्यांना सतावू लागल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कळवा येथील सात माजी नगरसेवकांनी गुरुवारी शिवसेनेचा भगवा हाती घेतला तर आणखी दोन माजी नगरसेवक लवकरच सेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीच्या ज्या नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला त्यांनी सेनेच्या उमेदवारांचा पराभव केला होता. आगामी महापालिका निवडणुकीत मागील पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत हे नगरसेवक असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्या छावणीत आल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याची भीती त्यांना सतावू लागली आहे.

राष्ट्रवादीच्या शिवसेनेत नव्याने आलेल्या माजी नगरसेवकांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याचे वचन सेनेच्या नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे मागील आठ वर्षे सेनेचा जनाधार कायम ठेवलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मनात चलबिचल सुरु झाली आहे. इतकी वर्षे मेहनत घेतली, त्याचे यावेळी फळ मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु अचानक त्या फळावर दुसऱ्याने हात मारल्याची भावना या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये निर्माण झाली असून आगामी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे अनेक इच्छुकांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
पक्षप्रमुख श्री.शिंदे हे आमच्यावर अन्याय करणार नाहीत,असा विश्वास देखिल काही जणांनी व्यक्त केला. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी पक्षाचे काम करणार असेही काही जणांनी सांगितले.

दरम्यान नव्याने प्रवेश घेतलेल्या राष्ट्रवादीच्या सात माजी नगरसेवकांचा सत्कार कळवा शिवसेना शाखेच्या वतीने घेण्यात आला. यावेळी खा.डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि शिवसेनेचे कळवा येथील पदाधिकारी उपस्थित होते.